औंध गटाच्या विकासाला नवी दिशा देण्याचे अंकुश गोरे यांचे आश्वासन; “जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार” – भारतीताई गोरे
औंध: निवडणुकीत औंध गटातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीताई गोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत औंध गटाला विकासाची नवी ओळख देण्याचा संकल्प व्यक्त केला.


औंध/प्रतिनिधी
औंध: निवडणुकीत औंध गटातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीताई गोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत औंध गटाला विकासाची नवी ओळख देण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी उपस्थित अंकुश गोरे यांनी गेल्या वीस-पंचवीस वर्षांत प्रस्थापित नेतृत्वाने केलेल्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “आता औंध गटाचा विकास थांबणार नाही, गती पकडणार आहे. जनतेला विकास म्हणजे नेमकं काय असतं हे येत्या काळात दाखवून देणार,” असे ठाम आश्वासन दिले.
पत्रकारांना संबोधित करताना भारतीताई गोरे म्हणाल्या, “औंध गटातील कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, रस्ते, तरुणांचा रोजगार, महिला बचत गटांचे सबलीकरण आणि स्थानिक लघुउद्योग यांसारख्या मूलभूत गरजांना प्राधान्य देऊन मी काम करणार आहे.” गेल्या कित्येक वर्षांपासून या समस्या तशाच ठेवण्यात आल्याची खंत व्यक्त करत त्या म्हणाल्या की, “प्रस्थापित नेतृत्वाने ज्यांना दुय्यम मानले, त्या प्राथमिक गरजाच आम्ही प्रथम सोडवणार आहोत.”
अंकुश भाऊ गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले की औंध व सह-परिसरातील जनता ज्या समस्यांनी त्रस्त आहे त्या सोडवण्यासाठी ठोस निर्णय आणि तत्पर अंमलबजावणीची गरज आहे. “कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रत्येक वाडी-गावापर्यंत स्वच्छ पाणी, तरुणांना रोजगारक्षम प्रशिक्षण आणि महिलांना आर्थिक बळ देणारे उपक्रम – हे सर्व कामे आमच्या कार्ययोजनेत अग्रस्थानी असतील,” असे अंकुश भाऊ म्हणाले. “औंध गटाचा चेहरा-मोहरा बदलणारी विकासकामे लोकांना स्वतः पाहायला मिळतील,” असेही त्यांनी जाहीर केले.
भारतीताईंनी पुढे सांगितले की, “लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. हा विश्वास सार्थ ठरेल याची मी पूर्ण हमी देते. पारदर्शक, जबाबदार आणि जनतेची गरज ओळखून काम करणारा विकास औंध गटात उभा राहणार आहे.”
पत्रकार परिषदेनंतर औंध गटात राजकीय वातावरण आणखी तापले असून, नागरिकांमध्ये नव्या नेतृत्वाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकीकडे विकासाच्या नावाने केवळ आश्वासने देणाऱ्या प्रस्थापित घटकांवर जनतेत नाराजी वाढत असताना, दुसरीकडे गोरे दाम्पत्याने मांडलेल्या ठोस विकास आराखड्यामुळे गटात नव्या आशा पेटल्या आहेत.
औंध गटाला बदल हवा आहे, आणि त्या बदलासाठी अंकुश गोरे यांचे आश्वासन आणि भारतीताई गोरे यांची कटिबद्धता हे महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरत असल्याचे स्थानिक पातळीवरून दिसत आहे.


